Genesis 46

1इस्राएलाने, आपले जे काही होते त्याबरोबर प्रवासास सुरुवात केली आणि तो बैरशेबास गेला. तेथे त्याने आपला बाप इसहाक याच्या देवाला अर्पणे वाहिली. 2रात्री देव स्वप्नात दर्शन देऊन इस्राएलाशी बोलला, तो म्हणाला, “याकोबा, याकोबा.” त्याने उत्तर दिले, “काय आज्ञा?” 3तो म्हणाला “मी देव आहे, तुझ्या बापाचा देव आहे. खाली मिसरास जाण्यास तू भिऊ नको, कारण मी तुझ्यापासून तेथे एक मोठे राष्ट्र तयार करीन. 4मी तुझ्याबरोबर खाली मिसरात जाईन, आणि मी तुला मिसरमधून पुन्हा आणीन. आणि योसेफ आपल्या हातांनी तुझे डोळे झाकील.”

5मग याकोब बैरशेबाहून उठला. इस्राएलाच्या मुलांनी आपला बाप, आपल्या बायका व मुले या सर्वांना फारोने पाठवलेल्या गाड्यांतून मिसरला आणले. 6त्याच प्रमाणे त्यांनी आपली शेरडेमेंढरे, गुरेढोरे आणि कनान देशात त्यांनी मिळवलेले सर्वकाही मिसरला नेले. 7त्याने आपल्यासोबत आपले मुलगे व नातू, आपल्या मुली व नाती या सर्व संतानांना मिसरात नेले.

8इस्राएलाचे जे मुलगे त्याच्याबरोबर मिसरला गेले त्याची नावे अशी : याकोबाचा प्रथम जन्मलेला रऊबेन; 9रऊबेनाचे मुलगे हनोख आणि पल्लू आणि हेस्रोन आणि कार्मी; 10शिमोनाचे मुलगे यमुवेल, यामीन, ओहाद, याकोन, सोहार आणि कनानी स्त्रीपासून झालेला मुलगा शौल; 11लेवीचे मुलगे गेर्षोन, कहाथ व मरारी;

12यहूदाचे मुलगे एर, ओनान, शेला, पेरेस व जेरह, (परंतु एर व ओनान हे कनान देशात मरण पावले. पेरेसाचे मुलगे हेस्रोन व हामूल); 13इस्साखाराचे मुलगे तोला, पुवा, लोब व शिम्रोन; 14जबुलूनाचे मुलगे सेरेद, एलोन व याहलेल 15(याकोबाला लेआपासून पदन-अरामात झालेली सहा मुलगे व दीना ही मुलगी; त्याच्या कुटुंबात मुले आणि मुली मिळून तेहतीस जण होते);

16गादाचे मुलगे सिफयोन आणि हग्गी, शूनी आणि एसबोन, एर, अरोदी, आणि अरेली; 17आशेराचे मुलगे इम्ना आणि इश्वा, इश्वी, आणि बरीया, आणि त्याची बहीण सेराह; आणि बरीयाचे मुलगे हेबर व मालकीएल 18(जिल्पा जी लाबानने आपली मुलगी लेआ हिला दिली होती, तिच्यापासून झालेले हे सगळे याकोबाचे मुलगे होते. ती एकंदर सोळा माणसे होती);

19याकोबाची पत्नी राहेल हिचे मुलगे योसेफ व बन्यामीन हे होते; 20(योसेफास मिसर देशातील ओनचा याजक पोटीफर याची मुलगी आसनथ हिच्या पोटी मनश्शे व एफ्राईम हे मुलगे झाले); 21बन्यामिनाचे मुलगे बेला, बेकेर, आशबेल, गेरा, नामान, एही, रोष, मुप्पीम, हुप्पीम आणि आर्द. 22(याकोबापासून राहेलीस झालेली ही मुले. सर्व मिळून ते सर्व चौदा जण होते);

23हुशीम हा दान याचा मुलगा होता; 24नफतालीचे मुलगे यासहेल, गुनी, येसेर आणि शिल्लेम हे होते. 25(लाबानाने आपली मुलगी राहेल हिला दिलेल्या बिल्हाचे याकोबापासून झालेले हे मुलगे. हे सर्व मिळून सात जण होते).

26याकोबाच्या वंशातील जी माणसे मिसरमध्ये गेली ती याकोबाच्या मुलांच्या बायका सोडून सहासष्ट जण होती. 27योसेफास मिसर देशात झालेले दोन मुलगे मिळून एकंदर याकोबाच्या घराण्यातले सत्तर जण मिसर देशात होते.

28याकोबाने प्रथम यहूदाला योसेफाकडे पाठवले; यहूदा गोशेन प्रांतात योसेफाकडे गेला त्यानंतर याकोब व त्याच्या परिवारातील सर्व मंडळी यहूदाच्या मागे गोशेन प्रांतात गेली. 29योसेफास आपला रथ तयार करून आपला बाप इस्राएल याच्या भेटीस गोशेन प्रांतात त्याला सामोरा गेला. योसेफाने आपल्या बापास पाहिले तेव्हा त्याने त्याच्या गळ्यास मिठी मारली व त्याच्या गळ्यात गळा घालून तो बराच वेळ रडला. 30मग इस्राएल योसेफाला म्हणाला, “आता मात्र मला शांतीने मरण येवो, मी तुझे तोंड पाहिले आहे, आणि तू जिवंत आहेस हे मला समजले आहे.”

31मग योसेफ आपल्या भावांना व आपल्या बापाच्या घरच्या सर्वांना म्हणाला, “मी जाऊन फारोला सांगतो की, ‘माझे भाऊ व माझ्या बापाच्या घरातील सर्व मंडळी हे कनान देश सोडून येथे माझ्याकडे आले आहेत. 32माझ्या बापाच्या घरचे सर्वजण मेंढपाळ आहेत, ते त्यांची शेरडेमेंढरे व गुरेढोरे पाळत आले आहेत. ते त्यांची शेरडेमेंढरे, गुरेढोरे व त्यांचे तेथे जे काही होते ते सर्व घेऊन आले आहेत.’

33जेव्हा फारो तुम्हांला बोलावून विचारील, ‘तुम्ही काय काम धंदा करता?’ तेंव्हा तुम्ही असे सांगा, ‘आम्ही सर्व मेंढपाळ आहोत. हा आमचा पिढीजात धंदा आहे. आमच्या आधी आमचे वाडवडील हाच धंदा करीत होते.’ मग फारो तुम्हांला गोशेन प्रांतात राहू देईल. मिसरी लोकांना मेंढपाळ आवडत नाहीत.”

34

Copyright information for MarULB